त्यांनी नवसाक्षरांसाठी, मुलांसाठी व प्रौढांसाठी तिसाच्यावर पुस्तके लिहिली आहेत. ‘गुंतागुंत’ (१९६७), ‘फेडाफेडी’ (१९७१), ‘पुन्हा प्रपंच’ (१९७८) यांमध्ये ललित स्वरूपाचे गद्यलेखन आहे. ‘तरीही हात शिवशिवतच राहिले’ (१९६५) ही कादंबरी भारत-चीन युद्धावर आधारित आहे. ‘एका जवान नावाच्या माणसाची कहाणी’ (१९८६) या कादंबरिकेत बांगला देश युद्धातील एका जवानाला आलेल्या अनुभवाची नोंद आहे. ‘बैलांचा गोंधळ’ (१९८५) मध्ये विनोदी कथा आहेत. त्यांनी ‘पाचूचे बेट’, ‘मनी हरवली मनी सापडली’, ‘हणम् वेरूळचे वैभव’, ‘सशाची फजिती’ अशी अनेक बालसाहित्याची पुस्तके आणि ‘जादूची पेटी’, ‘हिरवी क्रांती’, ‘दूधगंगा’, ‘रामू मास्तर’ अशी नवसाक्षरांसाठी सोप्या भाषेत पुस्तके लिहिली.
हेगडे यांची लेखनशैली मनमोकळेपणाची आहे; पण फाजील सलगी करणारी नाही. आवश्यक तेथे ती दैनंदिन गप्पाटप्पांसाठी सहजता धारण करते, तर कधी समर्थपणे एखादे चित्र रंगवताना ती प्रौढ, गंभीर होते. त्यांच्या पाच पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे आणि तेवढेच पुरस्कार मध्यवर्ती शासनाकडून मिळाले. त्यांच्या शाहिरी कलेचा सन्मान राज्य शासनाच्या सांस्कृतिक खात्याने ‘शाहिरी लोककला पुरस्कार’ (१९९५) आणि महाराष्ट्र फाउण्डेशनने ‘विशेष गौरव पुरस्कार’ (२००५) देऊन केला .