हाडाचे शाहीर असलेले लीलाधर हेगडे बालसाहित्यकार, कथाकार, कादंबरीकार, ललित गद्यलेखक म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म ठाण्याचा व बालपणही तिथेच गेले. त्यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. १९४२ सालच्या स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी भाग घेतला होता. १९४५ साली राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरात ते वसंत बापट यांच्या सहवासात आले आणि कायमचे शाहीर झाले. राष्ट्रसेवा दलाचे ठाणे जिल्हा संघटक म्हणून त्यांनी काम केले. १९४६ ते २००६, अशी साठ वर्षे त्यांनी शाहिरीतून समाजाचे प्रबोधन केले. महाराष्ट्र कला पथकामधून पु.ल. देशपांडे, वसंत बापट, शंकर पाटील यांच्या राष्ट्रीय तमाशांचे, तसेच व्यंकटेश माडगूळकरांच्या लोकनाट्यांचे त्यांनी असंख्य प्रयोग केले. ‘द्विभाषिकाचा फार्स’, ‘भारत दर्शन’, ‘आजादी की जंग’, ‘स्वतंत्र संग्रामदर्शन’ आदी कार्यक्रमांचे शेकडो प्रयोग त्यांनी महाराष्ट्रात व देशभरात केले आणि त्यांतून जनजागृतीचे काम केले.
१९८१ साली राष्ट्रसेवादलातून मुक्त होऊन त्यांनी सांताक्रूझ (पश्चिम) च्या साने गुरुजी आरोग्यमंदिराची जबाबदारी घेतली. ही बहुउद्देशीय शिक्षण संस्था तयार करून इथे शिक्षणाबरोबर कला, क्रीडा, व्यवसाय, आरोग्यसेवा हे सर्व एका छताखाली आणले. तसेच, आंतरभारती कला केंद्राची सुरुवात करून त्यांनी इथे ओडिसी या नृत्यशैलीचे शिक्षण सुरू केले.